५० वर्ष काँग्रेसने विकास केलेला नाही, आता काय करणार – आमदार रमेश आप्पा कराड

0
IMG-20260130-WA0259

बोरी : भातांगळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने बोरी येथे आज सकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचारादरम्यान संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या संवाद सभेला लातूर ग्रामीण विधानसभेचे आमदार रमेश आप्पा कराड हे प्रमुख उपस्थित होते. भातांगळी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार महादेव गुलाबराव साळुंखे, भातांगळी पंचायत समिती गणाचे उमेदवार पांडुरंग अशोक बालवड, व बोरी पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ. सिंधुबाई राजेंद्र खुरदळे यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने या संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या संवाद सभेला भातांगळी गटातील बोरी, मुशिराबाद, सलगरा बु, सलगरा खु ,बोकनगाव, बिंदगीहाळ ममदापूर, उमरगा या गावातील सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील असलेल्या समस्या, नागरिकांचे प्रश्न, आरोग्यविषयक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, व्यायामशाळा, समाज मंदिर, पाणी प्रश्न, पानंद रस्ते, शिवरस्ते व अनेक प्रकारच्या समस्याचा नागरिकांनी या संवाद सभेमध्ये आमदार रमेश आप्पा कराड यांच्याकडे पाढा मांडला. यावेळी सर्व गावकऱ्यांचे व मतदारांचे प्रश्न लवकरात- लवकर मार्गी लावणार असल्याचे आमदार कराड यांनी आश्वासन दिले.
पुढे बोलताना रमेश आप्पा कराड म्हणाले की, लातूर ग्रामीण भागात काँग्रेसने कोणतेही विकासकामे केलेले नाहीत, कोणत्याही शेतकऱ्यांना त्यांनी मदत केलेली नाही. या उलट शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी राजकारण करत स्वतःचे हित साध्य केले आहे. गेले 50 वर्ष काँग्रेस हे सत्तेत होते, त्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला साखर कारखाने यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करत प्रत्येक गाडीमागे तीन टणांच्या वजन काटा मध्ये काटा मारून ते लूट करत असतात आणि ही खरी वस्तुस्थिती असल्याचे मी सिद्ध करून दाखवणार, गेली 40 वर्षे झाली मांजरा सहकारी साखर कारखाना सुरू करून तेही अनेक कोटीच्या तोट्यामध्ये हा कारखाना आहे, कशामुळे तोट्यात आहे.. कुठे गेला एवढा पैसा..? याचा कुठेतरी विचार नागरिकांनी केला पाहिजे असा सवाल कराड यांनी व्यक्त केला, यापुढे साखर कारखाना हा त्यांचा घरचा नसून तो शेतकऱ्यांचा मालकीचा आहे, शेतकऱ्याकडे हक्काचे घर किंवा बंगला बांधला की, तो आमच्यामुळे झाला. तुमच्या दारात गाडी आली ही आमच्यामुळे आली, असा प्रश्न काही मक्तेदार करत असतात. अरे आम्ही त्यासाठी शेतात काबाडकष्ट केले, आमच्या लेकरांच्या तोंडातील घास काढून पीक पिकवतो आणि त्यामध्ये तुम्ही काळाबाजार करता, शेतकऱ्यांच्या पाचट कपातीवर त्यांनी काही प्रमाणात मोबदला द्यायचा आणि शेतकऱ्यावर उपकार केले असे दाखवायचा असे राजकारण काही कारखानदार करीत आले आहेत, यासारख्या अनेक माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक करून त्यांना वेटीस धरायचे काम काँग्रेसचे नेते व कारखानदार करत असल्याचा गंभीर आरोप केला, गेले 40 वर्षे झाली कारखान्याच्या गेटवर आंदोलन मी केली आणि आवाज उठवला त्यावेळी कुठे यांना जाग आली, आणि त्याने शेतकऱ्यांचा मोबदला दिला. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मला साथ द्या, मी सर्वांना लाईनवर आणतो अशा शब्दात त्यांनी सर्व नागरिक व शेतकऱ्यांना आश्वासन दिले, आत्ताही उसाच्या भावामध्ये काही रुपये जास्त दर देण्याचे उद्दिष्टे समोर ठेवले आहेत. मात्र ते दिली नाहीत, गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक या राजकारणातील कारखानदाराने केला असे खडेबोल स्पष्ट आरोप आमदार रमेश आप्पा कराड यांनी केले .
त्यानंतर भातांगळी जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करून विजयी करावे असे आव्हान नागरिकांना करण्यात आले, राष्ट्रांमध्ये भाजप, राज्यात भाजप आणि आपल्या मतदारसंघात ही भाजप आहे. त्यामुळे या भातांगळी गटांमध्ये भाजपाचे उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला. आमचे उमेदवार हे शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख गावात व परिसरात आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप नाहीत, गावातील विकासकामे त्यांनी केले आहेत आणि ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिळून मिसळून राहणारे व त्यांची सर्व कामे त्यांचे प्रश्न सोडवणारे जनसेवक आहेत, म्हणून त्यांना उमेदवारी दिल्याचे प्रतिपादन आमदार रमेश कराड यांनी व्यक्त केले. यावेळी या संवाद सभेला सर्व गावातील नागरिक आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!